तुझा मोहोर मखमली - काव्यसंग्रह
“तुझा मोहोर मखमली” - काव्यसंग्रह
कवी - उपेंद्र कुलकर्णी, शर्मिला कुलकर्णी
एकूण पाने - ११२
प्रकाशन साल - २०१८
पुण्यातलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) सुटून जमाना झाला असला तरी आमच्या इयत्तेतले जगभर पसरलेले लोक WhatsApp मुळे एकत्र बांधलेले आहेत. गेल्याच महिन्यात या ग्रुपवर शर्मिला कुलकर्णीनी सगळ्यांना एका पुस्तक प्रकाशन समारंभाचं निमंत्रण पाठवलं होतं. शर्मिला आणि तिचे पती उपेंद्र कुलकर्णी या दोघांच्या कवितांचं पहिलं-वहिलं पुस्तक ‘तुझा मोहोर मखमली’ याच्या प्रकाशन समारंभाचं.
ते निमंत्रण पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कॉलेजमधली पूर्वाश्रमीची शर्मिला आंबेकर आठवते ती थोडीशी शांत आणि कमी बोलणारी. कॉलेजमधलं वातावरण मुलामुलींनी कमी मिसळण्याचं असल्यानी शर्मिलाच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू माहिती नव्हते. पण तरी बोर्डात वगैरे आलेली असल्यामुळे तिच्या बुद्धीमत्तेबद्दल आदर होता. दोन-तीन वर्ष पुढे असणारा उपेंद्र कुलकर्णी देखील स्कॉलर म्हणूनच माहिती होता. त्यामुळे खरंतर त्यांनी पुस्तक लिहिण्याचं आश्चर्य वाटायचं कारण नव्हतं.
पुण्यात नसल्यामुळे प्रकाशन समारंभाला काही जाता आलं नाही, पण कार्यक्रमाची प्रकाशचित्रं आणि दृकश्राव्य झलक यथावकाश WhatsApp वर पाहायला मिळाली. लेखकांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाशन समारंभाला पालकांबद्दलच्या कृतार्थतेची आणि त्यांच्या ऋणाची काही अंशी परतफेड करायला मिळाली या समाधानाची जोड त्या कार्यक्रमाला मिळाल्यासारखी वाटली.
योगायोगानी महिन्याभरातच मला पुण्याला जाण्याचा योग्य आला. डेक्कनवरच्या बुकगंगा दुकानात हा कवितासंग्रह लगेचच मिळाला. आकर्षक शीर्षक असलेला एकशे बारा पानाचा हा आटोपशीर काव्यसंग्रह. मुखपृष्ठावरचं रंगीत चित्रही आकर्षक वाटलं. ग्रीष्मात फुललेला लालभडक गुलमोहोर वृक्ष आणि त्याच्या सावलीत ऐटीत चालणारा निळ्या-हिरव्या पिसाऱ्याचा दिमाखदार मोर असं मुखपृष्ठ. उत्सुकता अजून वाढली.
कवितासंग्रह घरी आणल्यावर आईनी वाचायला घेतला देखील. थोड्याच वेळात तिनी पसंतीची मान डोलावली.
कवी प्रदीप निफाडकर यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती किंवा त्यांचं नावही ऐकल्याचं आठवत नव्हतं. त्यांनी लिहिलेली अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवती प्रस्तावना वाचणं हा ही एक छान अनुभव होता. या प्रस्तावनेतूनच कळलं की पती-पत्नी दोघंही कवी असणं आणि दोघांचा मिळून एकत्र (किंवा स्वतंत्र) कवितासंग्रह प्रकाशित होणं याला मराठी भाषेत दोन-तीनशे वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, सावित्रीबाई आणि महात्मा फुले, पु. य. आणि निर्मला देशपांडे, श्रीधरपंत आणि मनोरमा रानडे, इंदिरा आणि ना. मा. संत, कुसुमावती-अनिल, लक्ष्मीबाई - ना. वा. टिळक अशी अनेक उदाहरणं निफाडकर प्रस्तावनेत देतात. मला वाटलं पहिल्याच काव्यसंग्रहामुळे या थोरांच्या रांगेत बसण्याचं भाग्य शर्मिलाताई आणि उपेंद्र कुलकर्णी यांना लाभलेलं आहे. अर्थात त्याबरोबरच यापुढे आलेख चढता राहील या अपेक्षेचं ओझंही दोघांवर आहे.
काव्यसंग्रहात उपेंद्र कुलकर्णींच्या छत्तीस आणि शर्मिलाताईंच्या एकोणीस कविता आहेत. शर्मिलाताईंच्या कविता मोठ्या असल्यामुळे पुस्तकात दोघांचं पृष्ठसंख्येचं योगदान सारखंच आहे. दोघाही कवींचं भावविश्व साधं सरळ आहे, पण नोकरीनिमित्त केलेल्या दीर्घ परदेशी वास्तव्यानी त्यात वेगळेपण आहे. संवेदनशील मराठी मनाला एक ग्लोबल छटाही आहे. म्हणूनच ‘चवीचे चटके’ या फक्कड खवैयांच्या कवितेत उपेंद्र सहजपणे परदेशी खाण्यालाही समाविष्ट करतात…
कष्टाचे चीज करोनी
पिझ्झ्याला त्याने मढवा
पास्त्याने पोट भरोनी
नूडलची ग्रेव्ही कढवा
अतर्क्य कल्पनाशक्ती हे तर कवींना मिळालेलं वरदानच. ‘कोल्होबांचा दवाखाना’ या विनोदी (बाल?) कवितेत उपेंद्र वर्णन करतात…
शहरातल्या इस्पितळाच्या खाटेवर
कोल्होबा जाऊन पडले
डॉक्टर होण्यापेक्षा म्हणे
पेशंट होणे परवडले
रावणानी लंकेत ‘राक्षसांची शाळा’ काढली ही अशीच एक भन्नाट कवी कल्पना. मग वर्गातला गोंधळ काय सांगावा…
महिषासुराचे दप्तर, शुंभाने तुडवले
शुंभ समजून गुरुजींनी, निशुंभालाच बडवले
या उलट ‘जुलुमाचा रामराम’ ही कविता सद्यपरिस्थितीवर आसूड ओढते…
काय खरे काय खोटे
खऱ्या खोट्याचे साटेलोटे
तुडुंब भरूनि हंडे लोटे
न्याय मागती अप्पलपोटे
‘बारा मजली’ या कवितेत विरोधाभास दाखवत उपेंद्र लिहितात…
गरिबी हटाव योजनेवरी आज माझे व्याख्यान आहे
कालचे उरलेले शिळे तुकडे, आज सखूला दान आहे
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात असलेल्या शर्मिलाताईंच्या कवितांना एक वेगळाच मराठी आणि परदेशी असा ढंग आहे. एक प्रकारचं फ्युजनच! त्यांची कविता ही जगभर फिरलेल्या उच्चशिक्षित करियर वूमनची जरी असली तरी महिलांचे विषय आणि प्रश्न यात सगळीकडे विलक्षण साम्य आहे.
जिथे आपलं घर असतं ते गाव आपलं वाटतं. त्यामुळे पुण्यासारखंच सिडनीही आपलं वाटून त्याबद्दल कविता सुचणं हे साहजिकच आहे. म्हणूनच सिडनीच्या एका दिवसाचं वर्णन संपवताना त्या म्हणतात…
दिव्यांच्या आराशीत
रात्र सारी सजली
धुक्याची शाल ओढून
सिडनी मग निजली
भरपूर कपडे खरेदी करणे हा बऱ्याच स्त्रियांचा आवडता छंद. त्यावरची ‘कपडे’ ही मजेशीर कविता बऱ्याच नवऱ्यांना भावेल अशी आहे…
कपाट उघडे, ढीग कोसळे
राग मला मग येतो
कपड्यांचा हा ढीग असा की
रोजच वाढत जातो
‘सिरीयलमधल्या बायका’ ही अजून एक गंमतशीर कविता. आपल्या सगळ्यांना पडणारे प्रश्न यात वाचताना हसू येतं…
घरात वावरताना शालू पैठण्या नेसतात
कामं करायची सोडून नुसत्या गोड हसतात
…
जगातल्या प्रॉब्लेम्सशी त्यांना नाही घेणं देणं
वेळ कसा मिळतो करायला कट कारस्थानं?
‘हत्तीणीचं डाएटिंग’ या कवितेतली कल्पना आणि तोडगा अतिशय लाजवाब!
‘पोळ्या लाटता लाटता’ ही कविता तर सगळ्या भारताबाहेर राहणाऱ्या NRI गृहिणींना थेट भिडावी. त्यांचीच ही कहाणी…
इथे येऊन तू ‘गडी’, मी ‘मोलकरीण’ झाले
‘बाईसाहेब’ म्हणून घ्यायला माझे कान आतुरले
कॉलेजमधल्या दिवसांची ‘माझं इंजिनीयरिंग’ ही कविता समस्त इंजिनीयर लोकांना एकदम भावेल अशी मजेशीर आहे…
वाटलं सोप्पा गेला पेपर
अप्लाईड मेकॅनिक्स
पण पेपरात मार्क आले
फक्त थर्टी सिक्स
अश्या कविता वाचता-वाचता तासाभरात पुस्तक वाचूनही झालं.
कोणतंही पुस्तक वाचून संपलं की त्यानंतर लगेच आपल्याला काय वाटतंय यांच्याकडे लक्ष ठेवायचं ही सवय. प्रत्येक पुस्तक वाचून झालं की काही ना काही भावना मनात येत असतात. पुस्तकाचा गाभा आपला प्रभाव वाचकावर सोडल्याशिवाय राहत नाही. एखादं पुस्तक वाचून संपलं की एकदम रितं वाटतं, तर एखादं पुस्तक वाचून झाल्यावर अस्वस्थता येते. काही पुस्तकं वाचल्यावर विलक्षण भारावून जायला होतं. तसं ‘तुझा मोहोर मखमली’ कवितासंग्रह वाचून झाल्यावर एक प्रकारची शांतता वाटली. पती-पत्नी साधारण एकाच वेव्हलेंथवर असल्यावर येणारा सुसंवाद सुखदायक आणि शांतिकारक वाटला. संसारामधले आणि कदाचित इतरही चढउतार अनुभवल्यावर दोघांची जीवनाबद्दलची आणि एकमेकांबद्दलची कृतज्ञता जाणवून आली. आजकालच्या धावपळीच्या आणि आत्मकेंद्रित जगात पती-पत्नींमधला असा शांत तृप्त अनुभव किती जोडप्यांना येत असेल हा प्रश्नही पडला.
लेखन, गायन इत्यादी बाबतचा दुसरा अनुभव म्हणजे लेखक, कवी किंवा इतरही कलाकारांना रसिकांचा अभिप्राय प्रिय असतो. पण त्याही बरोबर सूचनाही हव्या असतात. त्यातून त्यांना वाचकांचं किंवा प्रेक्षकांचं अंतरंग कळत असतं. त्यायोगे पुढच्या कलाकृतीत अजून नवीन प्रयोग करता येतात.
अतिशय नेटक्या अश्या या काव्यसंग्रहात काही राहून गेलंय का? केवळ अभिप्रायासाठी म्हणून का होईना, काही म्हणता येईल का?
कवितेची एक सुसंबद्ध ओळही लिहिता न येणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य वाचकानी कोणत्याही कवितासंग्रहाबद्दल काही सांगायचं म्हणजे कधीही बॅट हातात न धरलेल्या एखाद्या भोपळ्यानी कसलेल्या फलंदाजाला बॅटिंग कशी सुधारावी हे सांगण्यासारखं आहे. पण तरीही वाचताना आलेला अनुभव त्या कलाकृतीच्या कर्त्यापर्यंत पोचवायची जबाबदारी प्रामाणिकपणे अभिप्राय देणाऱ्या वाचकाची असते. त्या भावनेपायी वाटले पुस्तकात मुद्रणाच्या किरकोळ चुका राहून गेल्या आहेत. ती जबाबदारी छपाई आणि तंत्र विभागाची असली तरी कलाकृतीवर नाव त्याच्या कर्त्याचंच असतं. म्हणजे अंतिम जबाबदारी ती कर्त्याचीच.
दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे शर्मिलाताई आणि उपेंद्र या दोघांच्या कवितांचे विषय साधारण सारखेच आहेत. घर, घरातलं लहान मूल, समाजातली विषमता, ढासळती मूल्ये इत्यादी सारखेच विषय दोघांच्या कवितेत येतात. त्यामुळे कविता साधारण सारख्याच वाटतात. अर्थात वीस-पंचवीस वर्षाचा संसार बरोबरीने केल्यावर पती-पत्नींना येणारे अनुभव सारखे असणारच. आणि त्यामुळे कवितेचे विषयही मिळते-जुळते असणं हे समजण्यासारखं आहे. कवितासंग्रह वाचताना दोघांची तयारी दिसून येते आणि लक्षात येतं की अजून बरेच नवीन विषय हे दोन कवी अतिशय समर्थपणे हाताळू शकतील. नवीन विषयांवर इतक्याच रंजक, उद्बोधक, अस्वस्थ, आश्वासक आणि शांतीदायक कविता आपल्याला वाचायला देऊ शकतील. उभयतांची सर्जनशीलता अशीच अखंडित राहून तो योग लवकरच येवो ही सदिच्छा आणि अपेक्षा!
------
२४ फेब्रुवारी २०१८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा