आधार
आधार
कालचीच गोष्ट. रविवारचा दिवस. सुट्टीमुळे थोडा निवांतपणा असला तरी लवकर जाग यावी असं बऱ्याच वेळा होतं. सकाळीच जगाच्या त्या टोकाला असणाऱ्या शाळकरी मित्र सुधीरनी WhatsApp ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवला होता. त्या चार मिनिटाच्या काळ्या-पांढऱ्या व्हिडिओत आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं होतं. पहिल्या काही सेकंदातच कलावती रागाचे सूर ऐकू आले आणि जलद गतीतलं उडत्या चालीचं गाणं सुरु झालं. गाण्याचे शब्द होते "माझ्या रे प्रीती फुला".
या गाण्यात बऱ्याच गोष्टी वेगळ्या वाटल्या. गाणं ऐकल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नव्हतं, पण गाण्यात १९६९-७० सालच्या पुण्याची झलक बघायला मिळाली. स्वच्छ सारसबाग, त्यात चालू अवस्थेत असणारी कारंजी, झोपड्या नसलेली पर्वती, आणि रिकामे रस्ते पाहून त्या काळात गेल्याचा आनंद मिळाला. त्याकाळचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात केवढा तरी फरक पडलेला दिसला.
गाण्यात त्याकाळच्या मानानी हिरो-हिरॉईनमधे जरा जास्त जवळीक (अमेरिकन भाषेत PDA) वाटली. गाण्यातले नट-नटी आकर्षक आणि अनोळखी होते. मग या गाण्याबद्दल, कलाकारांबद्दल आणि एकूणच सिनेमाबद्दल कुतूहल वाटलं आणि शोध सुरु झाला. गुगलवरती शोध सुरु केल्यावर काही सेकंदातच माहिती कळली. ‘आधार’ या चित्रपटातलं हे गाणं आहे असं समजलंच, पण त्याच पानावर संपूर्ण चित्रपट यू-ट्यूबवर आहे हे ही कळलं. नाहीतरी रविवारच होता, फारसं काम नव्हतं. आणि मुख्य म्हणजे अन्न-वस्त्र-निवाऱ्याएवढीच महत्वाची असणारी वाय-फायची गरजही पूर्ण होत होती, त्यामुळे चित्रपटाच्या लिंकवरती क्लिक करण्याशिवाय दुसरा बरा पर्याय नव्हता.
दिग्गज लोकांचा सहभाग असलेला सिनेमा! ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली गाणी, सुधीर फडक्यांचे संगीत. राजा परांजपे, विवेक, अनुपमा (सध्याच्या शिकागोस्थित धारकर?) आणि बाळ कोल्हटकर हा नट संच. आशा भोसले, वसंतराव देशपांडे आणि फडक्यांनी गायलेली गाणी. शकुंतला गोगटे यांच्या ‘चांदणे शिंपीत जा’ या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा थोडा ‘चिक फ्लिक’च्या जवळ जाणारा वाटला तरी सगळ्या पात्रांना वेगळीच आयडेंटिटी आणि भरीव काम होतं. महत्वाचं म्हणजे त्यावेळची परिस्थिती, लोकांचे मर्यादाशील स्वभाव, सुसंस्कृतपणा, तसेच मनुष्यस्वभावाचे कायमस्वरूपी असणारे दोष प्रकर्षानी जाणवले. गेल्या पन्नास वर्षात समाजात किती बदल घडला आहे. जुने सिनेमे म्हणजे त्यावेळची कालकुपी (time capsule चं हे भाषांतर चालावं) म्हणता येईल. एकप्रकारे त्यावेळच्या समाजाचा घेतलेला फोटोच.
रसभंग होईल म्हणून चित्रपटाच्या गोष्टीबद्दल जास्त सांगणं चूक ठरेल. पण विषय अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा आणि छान हाताळलेला होता. आजही चालून जावा असा. राम केळकरांचे अर्थपूर्ण, सोपे आणि थेट मुद्द्याचे संवाद. शब्दांचा अजिबात फापटपसारा नाही. हेच राम केळकर म्हणजे हिंदी आणि मराठी सिनेमांच्या पटकथांचे गॉडफादर. सुभाष घईचा उजवा हात. त्यांनी लिहिलेले कालिचरण, आप की कसम, हिरो, राम-लखन, खलनायक, आशा असे जवळ जवळ पन्नास चित्रपट धोधो चालले! ‘आधार’ चित्रपट ही त्या आधीची झलक. राजा परांजपे, अनुपमा आणि बाळ कोल्हटकर यांचा उत्तम अभिनय पहाणं आणि नितळ शुद्ध मराठी ऐकणं ही पर्वणीच होती. आजकाल दूरदर्शन सह्याद्रीवर देखील असं शुद्ध मराठी ऐकू येईल याची खात्री देता येत नाही.
शास्त्रीय संगीत ज्यांना कळतं त्यांना तर अजूनच मजा यावी. बाबूजींनी जाणूनबुजून केलेला निरनिराळ्या वाद्यांचा चपखल उपयोग. प्रत्येक प्रसंगांमधले सतार, सरोद आणि व्हायोलिनच्या संगीताचे तुकडे. तेही प्रसंगाच्या मूडला असणाऱ्या रागांमधे असल्यामुळे त्याचा परिणाम उत्तम होत होता. वसंतराव देशपांडेंनी जोरदार गायलेल्या ‘काही तरी तू बोल’ या गाण्यात वेगळे राग, वेगळे ताल होते. आणि त्यावर कोल्हटकरांचा अभिनय म्हणजे मराठी संगीत नाटकांचा समृद्ध वारसा चित्रपटांना कसा मिळावा हे ही कळावं.
त्या काळी हा चित्रपट कसा चालला याची कल्पना नाही, पण परांजपे, गदिमा आणि फडके या त्रिकुटाची जबरदस्त ताकद ‘आधार’मधेही कळून आली. दोन तास कसे निखळ आनंदात, करमणुकीत आणि अंतर्मुख करून गेले.
इंटरनेट आणि मोबाईल फोनमुळे आपली सगळ्यांचीच जीवनशैली बदलली आहे. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण पाहतोच आहोत. पण अंतर कमी झालेलं जग आणि बसल्या जागी कुठलीही माहिती क्षणात मिळायची सोय, या दोन गोष्टींमुळे कधीतरी असा सुखद अनुभव येऊन जातो. हातात वेळ मात्र असायला हवा. असा अनपेक्षित आनंद मन टवटवीत करतो. धावपळीच्या जगात हा एक प्रकारचा आधारच म्हणायचा!
१६ जुलै २०१७
--------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा