आपली वृंदा
‘वृंदा’ हे नाव घेतलं की एक हसरा आणि किंचित मिश्किल अशी झाक असलेला चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. पुण्याला ज्या अभिनव विद्यालयात शिकलो तिथे जवळजवळ पहिलीपासून एकाच वर्गात असलेले आम्ही सगळे मित्रमैत्रीणी. अशा या एकसंध वर्गात कोणी नवीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आले की अप्रूप वाटायचं. त्यामुळे आमच्या चौथीच्या वर्गात वृंदा पहिल्यांदा आली तेव्हा उत्सुकता असणार. कोण आहे, कुठून आली आहे, वगैरे. लहानशी चण, गोल चेहरा आणि केळकर आडनावाला शोभेल असा गोरा रंग व घारे टपोरे डोळे. ती वर्गात पहिल्या एक-दोन रांगांमध्ये बाकावर बसायला लागली. तिच्या बाबांची बदली कोल्हापूरहून पुण्यात झाली होती बहुतेक. नवीन गाव, नवीन शाळा याचे तिला नक्कीच दडपण आलं असणार. पण लवकरच मनमिळावू स्वभावाने आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ती वर्गात रुळली. इतकी की नंतर ती सगळ्यांची ‘आपली वृंदा’ झाली.
योगायोग असा की वृंदाचे कुटुंब आमच्या गल्लीतल्या एका बंगल्यात राहायला आले होते. एकाच सोसायटीतल्या बिल्डिंगमध्ये माझा बाल सवंगडी भरत आणि मी राहत होतो. आणि आम्ही दोघे एका वर्गातही होतो. त्यामुळे आमची जोडगोळी होती. आता वृंदा पण आमच्याच वर्गात आल्यामुळे आम्हा तिघांची चांगली मैत्री जमली. वृंदाची धाकटी बहीण वृषाली पण आमच्या शाळेत दाखल झाली होती आणि ती माझ्या धाकट्या बहिणी बरोबर होती. लवकरच आम्ही मुले एकत्र मिसळलो. घरी येणं जाणं वाढलं. भरत, त्याची मोठी बहीण, मी आणि माझी धाकटी बहीण मिळून बऱ्याच वेळा संध्याकाळी वृंदाच्या घरी खेळायला जात होतो. ते रहात होते तो देवगिरीकरांचा बंगला खूप प्रशस्त होता. त्याच्या आजूबाजूला झाडे होती. सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे त्या बंगल्याला सिरॅमिक टाइलच्या गुळगुळीत ठिकऱ्या लावलेली गच्ची होती. ही गच्ची आम्हाला खेळायला खूप आवडत असे.
इयत्ता पाचवी. वृंदा - पुढून दुसऱ्या ओळीत, डावीकडून दुसरी.
रुमाल पाणी, शिवाशिवी किंवा ठिकऱ्या हेच आमचे खेळ. नाहीतर एकमेकांना काहीतरी चिडवून पळून जायचं. कोल्हापूरहून आली म्हणून भरत आणि मी तिला ‘कोल्हापूरचा पैलवान’ असं म्हणून चिडवायचो. नाही तर ‘वृंदाच्या लग्नाच्या भाकऱ्या थापा’ म्हणत जमिनीवर भाकऱ्या थापायची ऍक्टिंग करायची. चौथीतली आमची तेवढीच बाल बुद्धी. आम्ही असं म्हणल्यावर लटक्या रागाने ती आम्हा दोघांना मारायला धावायची. मग आम्ही पुढे आणि ती मागे. गच्चीतल्या टाकीला पाच-सहा चकरा मारून दमून थांबायचं आणि भरपूर हसायचं. पण वृंदाच्या हाती सापडलं की काही खरं नसे. चांगले गुद्दे घालायची. मग परत ‘कोल्हापुरी पैलवान’ म्हणून आम्ही भरपूर हसायचं, अन त्यात तीही सहभागी व्हायची. त्यात केवळ निरागस मैत्री आणि निखळ आनंद होता. खऱ्या अर्थाने आम्ही बाल सवंगडी होतो.
आम्ही तिघे बऱ्याच वेळी शाळेत पायी जात-येत होतो. अभ्यास आणि गृहपाठ बरोबर करत होतो. तिचं अक्षर फार छान होतं. टपोरं आणि सुटसुटीत. गिचमिड नाही. खाडाखोड नाही. तिच्या स्वभावासारखंच स्वच्छ आणि मोकळं. तिला गाण्याची आवड होती. ती बहुदा गाणं शिकत असावी कारण ती धीटपणे शाळेतल्या कार्यक्रमात गाणी म्हणायची. त्यावेळी आकाशवाणीवर शनिवारी किंवा रविवारी दुपारी लहान मुलांची गाणी तासभर लागत असत. त्यातलच एक प्रसिद्ध झालेले बालगीत
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू,
चल ग आई, चल ग आई, पावसात जाऊ
हे गाणं ती खूप मोकळ्या आवाजात छान म्हणायची. मुकेशचं ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ हे गाणंही ती नेहेमी म्हणायची. पाचवी-सहावीतली एक आठवण आता अंधुक आठवते. कुठल्या तरी आंतरशालेय स्पर्धेत आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी वृंदाचं आणि माझं नाव दिलं होतं. राष्ट्रभक्तीपर गीत किंवा समरगीत काहीतरी म्हणायचं होतं. असं गाणं म्हणायची माझी पहिलीच वेळ होती. त्यावेळी वृंदानी आणि मी एक एक सोलो गाणं सादर केलं. कुठलं गाणं म्हटलं हे आता नक्की आठवत नाही, पण वृंदाची पांढरा फ्रॉक, पायात पांढरे मोजे आणि पांढरे कॅनवासचे बूट यातली गोरी वामन मूर्ती अजून डोळ्यासमोर आहे. सगळ्यांसमोर गाणं म्हणायचं म्हणून मी चांगलाच घाबरलो होतो. पण ही पठ्ठी धीटपणे छान गाणं सादर करून आली. त्याच धीटपणाने ती बहुतेक पुढेही आयुष्यात सामोरे गेली असणार. दोन वेण्या आणि फ्रॉक घातलेल्या या मैत्रिणीचं कौतुक वाटायचं. सहावी-सातवी म्हणजे खरंतर इनसिक्युरिटीचं वय. अभ्यासात आपण स्कॉलर मुलामुलींपेक्षा कमी पडतो आहे अशी धास्ती असायची. पण वृंदा मात्र नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आणि मनमोकळ्या स्वभावाने दुसऱ्यांना उत्तेजन देत असायची.
दोन-तीन वर्षांनी तिच्या बाबांनी पुण्यात घर घेतलं आणि केळकर कुटुंब तिकडे रहायला गेलं. त्याच सुमारास, म्हणजे आठवीत, आमचे मुला-मुलींचे वर्ग वेगळे झाले. मुलींची शाळा सकाळची झाली आणि मुलांची दुपारची. इतके वर्षे रोज भेटणारे आम्ही मित्र-मैत्रिणी आता कमी वेळा भेटायला लागलो. हळूहळू रस्ते वेगळे होत गेले आणि अंतर पडायला सुरुवात झाली. अकरावी-बारावीला आम्ही तिघं एकाच गरवारे कॉलेजमध्ये दाखल झालो. पण मी सायन्सला, आणि भरत आणि वृंदा कॉमर्सला. दोन्ही विभागांच्या इमारतीमध्ये अंतर होतं त्यामुळे अधेमधे भेट होत होती. बारावीनंतर तर माझं कॉलेजही बदललं, त्यामुळे भेट बंदच झाली. कॉमन मित्र-मैत्रिणींकडून खबरबात कळत होती. कधी कॉलेज आणि क्लासला रस्त्यात जाता येताना झाली तरच तिची भेट व्हायची. जेव्हा जेव्हा भेट व्हायची त्यातून तिच्या कमी अपेक्षा, साधा स्वभाव आणि समाधान लक्षात राहायचं. आस्थेने ती माझी, बहिणीची, आई-वडिलांची आणि इतर वर्गातल्या मित्र-मैत्रिणीची चौकशी करायची.
बीकॉम झाल्यावर ती काय करत होती ते आता लक्षात नाही. पण लवकरच तिचं लग्न ठरलं. आमचीच वर्गमैत्रीण असलेल्या सुपर्णाच्या मोठ्या भावाशी. सुपर्णा आणि वृंदा या मैत्रिणी आता नणंद-भावजय होणार होत्या. आधीच समाधानी असणारी असणारी वृंदा आता अजून आनंदी झाली होती. आम्हा वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना लग्नाचं आमंत्रण अर्थात होतंच. सगळ्यात पहिल्यांदा लग्न झालेली आमची वर्गमैत्रीण वृंदाच असावी. त्यावेळी मला फोटोग्राफीची फार आवड होती. ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट काढायला मजा यायची. म्हणून मी फिल्म कॅमेरा घेऊन तिच्या लग्नाला गेलो होतो. कोहिनूर मंगल कार्यालयात. लग्न लागले, विधी झाले आणि पंगत पार पडल्यानंतर वृंदा आणि सुनील आम्हा मित्र-मैत्रिणींच्या बरोबर थोडा वेळ गप्पा मारायला येऊन बसले.
दिवसभराच्या कार्यक्रमांनी दमलेला आणि कदाचित थोड्याच वेळात सासरी जाण्याच्या चाहूलीने थोडा हुरहुरलेला चेहरा. लग्नाचा शालू नेसलेला, मनगटावर हळकुंड बांधलेलं, गळ्यात नवीन मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा असलेलं तिचं पोर्ट्रेट मला काढायला मिळालं. आणि अचानक आपण सगळेजण मोठे झालो आहोत अशी जाणीव झाली. नंतर ते पोर्ट्रेट दिलं तेव्हा ते तिला खूप आवडलं.
पुढे मलाही नोकरी लागली. पुणं सुटलं. त्यामुळे संपर्क तुटला. सुट्टीसाठी पुण्यात गेल्यावर मित्रांना भेटायचा प्रयत्न करत होतो. बरेचसे वर्गमित्र नोकरीनिमित्त पुण्याबाहेर गेलेले होते, आणि मैत्रिणी नवीन संसार आणि लहान बाळांमध्ये गुंतल्या होत्या. तरी बाल सवंगड्यांची ओढ असल्यामुळे वेळ काढून तारेवरची कसरत करून जमेल तसे बरेच जण येत होते. वृंदाची अशीच एकदोन वेळा प्रत्यक्ष भेट झाली. त्याही वेळा कॅमेरा बरोबर होताच. एव्हाना ती संसारात छान रुळली होती. आनंदी आणि समाधानी. तोच मोकळा स्वभाव, तेच ॲनिमेटेड हातवारे. तेच दिलखुलास हसणे. त्यावेळी काढलेला हा फोटो म्हणजे साधारण पंधरा वर्षांपूर्वीचा.
त्यानंतर मग वृंदा तिच्या कुटुंबीयांसोबत ठाण्याला स्थलांतरीत झाली आणि मग तिची प्रत्यक्ष भेट परत कधीच झाली नाही. मध्ये अनेक वर्षे गेली. मोठी गॅप पडली. माझी जरी भेट झाली नाही तरी त्या मैत्रिणी-मैत्रिणी भेटत होत्या. त्यांचे फोटो अनिता आणि राजश्रीकडून मिळत होते.
पण चार-पाच वर्षांपूर्वी शाळेचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. त्यामुळे वृंदाशी आणि शाळेतल्या मित्रमैत्रिणींशी अचानक परत संपर्क सुरु झाला. शाळा कॉलेजच्या लहान वयातल्या मैत्रीचं विशेष हे की मध्ये तीस एक वर्षे जरी गेली असली तरी ती जाणवत नाहीत. तीच मैत्री, तोच जिव्हाळा, तीच ओढ, आणि आता वाढत्या वयानी आलेली समज.
तिच्या वाढदिवसाला एकदा फोन केला होता. तेव्हा तिला खूप आनंद झाला. भरपूर वेळ बोलली. ती ठाण्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकत होती. दोन मुलं झाल्यानंतर तिनी विशारद पूर्ण केलं होतं, आणि आता पुढच्या परीक्षेची तयारी करत होती. तिची मुलगी अनुष्का पण शिकत होती हे तिने अभिमानानी सांगितलं. मी पण माझी खबरबात दिली. मी आणि माझी मुलगी परदेशात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकतोय याचं तिला काय अप्रूप. खूप कौतुक केलं. गाण्याबद्दलच आमच्या खूप गप्पा झाल्या. नंतर एकदोन वेळा फोन झाला. तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तेव्हा तेच परत आमंत्रण. ‘बायको आणि मुलींना घेऊन ठाण्याला माझ्या घरी ये’! तो योग कधी आला नाही.
आणि दुर्दैवाने आता तो येणेही शक्य नाही. काल अचानक काही ध्यानीमनी नसताना वृंदा गेल्याची बातमी कळली. ‘आपली वृंदा आज गेली’ असा राजश्रीचा मेसेज आला. इतक्या हसऱ्या वृंदाला भरल्या संसारातून उठवण्याचा नियतीने क्रूर डाव टाकला. चार महिन्यापूर्वी तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर कीमो झाल्या, उपचार झाले. फक्त चार महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. स्वतःचा डांगोरा न पिटणारी वृंदा, आपल्या आजाराचा उगीच कशाला गाजावाजा म्हणून धीटपणे आजाराला सामोरे गेली. ही सगळी माहिती आज कळली. तिला आजार होता याची काहीही कल्पना नसल्यामुळे वृंदाचं असं अचानक जाणं फारच धक्का देणारं आणि चटका लावणारं आहे.
‘आपली वृंदा’ हे शब्द तंतोतंत खरे. प्रत्येकाला आपली वाटावी हा तिचा स्वभाव होता, आणि हीच तिची आयुष्यातली सर्वात मोठी कमाई. तिची निकोप मैत्री आणि निखळ प्रेम आम्हा मित्रमैत्रिणींच्या वाट्याला आलं म्हणून आमचं भाग्यच. पण वृंदाच्या स्वतःच्या भाग्यचं काय? या प्रश्नाला काही उत्तर सापडत नाही.
‘टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू, चल गं आई, चल गं आई, पावसात जाऊ’ असं सुरेल गाणं म्हणणारी वृंदा खरोखरच ऑगस्ट महिन्यातल्या टप टप पडणाऱ्या पावसामध्ये आईला, वडिलांना, मुलांना, नवऱ्याला आणि कुटुंबीयांना मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला बाहेर निघाली होती!
(मिलिंद कुलकर्णी - २२ ऑगस्ट २०२४)
Khupach Sundar lihilay ha blog. Me Vrunda chi alikadchya kalatli jeevabhavachi maitrin, Vrunda jashi mala bhetli Ani bhaavli, ti lahanpana pasun tashich hoti he aaj kalla Ani patla.
उत्तर द्याहटवाMilind, you have painted Vrunda's portrait soooo nicely... one can hear Vrunda singing her favourite song.... And every raindrop falling on the ground is going refresh her presence in our memories....forever!Vrunda was my Sr in the school and I have very fond memories of interaction with her.
उत्तर द्याहटवामिलिंद खूप सुंदर लिहिलंस. शब्दचित्र आहे हे वृंदाचे. तिची आई माझी मैत्रीण.आरती सोसायटीत तुम्ही राहत होता. मी तुला ओळखत मी आजयची आई..इतके सिंदर मराठीत तु लिहिलेस. सच्या भावना व्यक्त केल्यास.
उत्तर द्याहटवाMilind खूपच सुंदर लिहिले आहेस.....thank you 🌹
उत्तर द्याहटवा