‘प्राईम मेन्स वेअर’चा जनक
‘प्राईम मेन्स वेअर’चा जनक
१९ डिसेंबर २०१८. नेहेमीसारखाच एक बुधवार. सकाळी सहाच्या सुमारास उठून थोडं आवरून झाल्यावर सवयीने फोन उचलला आणि WhatsApp बघायला सुरुवात केली. जगभरात पसरले असले तरी सगळ्यांना जवळ आणणारा एक चमत्कार आणि समान दुवा म्हणजे WhatsApp. आपल्याला WhatsApp चं बहुतेक व्यसन लागलंय हे समजत असूनही त्याशिवाय राहवत नाही अशी माझी परिस्थिती.
शाळेतल्या मित्रांच्या ग्रुपवर मकरंदचा दोन तासापूर्वी मेसेज होता, “आपला वर्गमित्र नितीन माने गेला.” फोनाफोनी सुरु झाली. बातमी खरी आहे का? थोड्याच वेळात खुद्द नितीनच्याच फोनवरून अजून एक निरोप आला, “माझे वडील नितीन माने यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार वैकुंठमध्ये अमुक-अमुक वाजता होणार आहेत - कुणाल माने”. म्हणजे नितीनच्या मुलानेच तो निरोप पाठवला होता. दुर्दैवाने अश्या बातम्या खऱ्या असतात तशी ही पण बातमी खरी निघाली होती. भारतात तेव्हा संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते. एकदम धक्काच बसला सगळ्यांना.
डावीकडून तिसरा नितीन - पुणे, मे २०१८ |
पुण्यातल्या कर्वे रस्त्यावरच्या नळ स्टॉप जवळच्या अभिनव विद्यालय शाळेच्या मराठी माध्यमातले आम्ही सगळे विद्यार्थी. बालवाडी ते दहावीपर्यंत. साधारण १९७३ ते १९८४ या काळातले. मित्रांची नावे किंवा आडनावे अर्धी तोडून त्याला शेवटी “या” असा प्रत्यय लावून नवीन नामकरण करायचे अशी त्यावेळची आमची पद्धत. म्हणजे मकरंदचा झाला “मक्या”. पद्मनाभचा झाला “पद्या”. रवींद्रचा झाला “रव्या”. मिल्या, सुन्या, भऱ्या, सद्या आणि बरेच काही. तसाच नितीन मानेचा “नित्या” झाला, तो अगदी आजतागायत.
आमचा सात-आठ मित्रांचा ग्रुप. सहावी-सातवीच्या सुमारास कोणीतरी आम्हाला टेबल-टेनिसचा खेळ शिकवला. कोणी शिकवला ते आठवत नाही पण त्याची चांगलीच गोडी लागली. प्रभात रोडवर फिल्म इन्स्टिट्यूटच्या समोर एका बारीक गल्लीत डाव्या हाताला दुसरी-तिसरी एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगच्या तळाशी एक छोटी आऊट-हाऊस वजा गॅरेजची खोली होती. त्या खोलीत एक टेबल-टेनिसचे टेबल होतं. तासाला चार आणे या दरानी ते टेबल भाड्यानी मिळायचं. शाळेपासून ही जागा अगदी चार-पाच मिनिटाच्या अंतरावर होती. त्यावेळी आमच्या सगळ्यांकडे सायकली आल्या होत्या. शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीत सायकलवर टांग मारून आम्ही मित्र टेबल-टेनिसच्या खोलीत पोहोचायचो आणि चांगले दोन-तीन तास मनसोक्त ‘टीटी’ खेळायचो. छोटाश्या गॅरेजमध्ये दाटीवाटीने उभे राहून आणि खेळून सगळे घामाघूम होऊन जायचो. या मित्रांच्या घोळक्यात मक्या, पद्या, रव्या, भऱ्या, सुन्या, मिल्या आणि नित्या हमखास असायचे. इथून खरंतर नितीन आमचा झाला आणि आम्ही नितीनचे झालो.
त्यावेळची नितीनची शाळेच्या गणवेशातली मूर्ती अजून डोळ्यासमोर आहे. पांढऱ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट. त्याखाली नेव्ही ब्लू रंगाची अर्धी चड्डी. जाड कॉटनच्या कापडाची. वापरून धुवट झालेली. साधारण आजकालच्या जीन पँटच्या रंगाकडे जाणारी. अर्ध्या चड्डीच्या खिशातून कधीकधी दिसणारे पांढरे अस्तराचे कापड. सडपातळ बांधा. मध्यम उंची. सावळा रंग. गोल चेहेरा तसेच गोल बोलके डोळे. विस्कटलेले केस. शांत स्वभावाचा नितीन कमी बोलायचा, पण त्याचा चेहेरा आणि डोळे मात्र बोलायचे. आमच्या मित्राच्या कंपूमधे सर्वात कमी बोलणारा बहुतेक नितीनच असावा. त्याचा आवाज पातळ आणि साधारण ‘हाय पीच’ म्हणता येईल असा. सगळ्या गोष्टींना साथ द्यायला नितीन कायम तयार. नाही म्हणणं नाही.
सहावीपर्यंत आमच्या वर्गात मुलं आणि मुली एकत्र होते. सातवीपासून मुला-मुलींची शाळा वेगळी झाली. मुलींची शाळा सकाळची, तर मुलांची शाळा दुपारी त्याच बिल्डिंगमध्ये भरायला लागली. शाळेत बरेच बदल व्हायला लागले. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जशी houses असतात म्हणे, त्या धर्तीवर आमच्या मराठी शाळेत ‘कुल’पद्धती सुरु झाली. शाळेतली सगळी मुलं सहा कुलांमध्ये विभागली गेली. प्रगल्भ, प्रकर्ष, प्रगत अशी ‘प्र’वरून सुरु होणारी सहा कुलांची नावे. प्रत्येक कुलाला वेगळा रंग, चिन्ह, शिक्षक. मुलांमध्ये स्पर्धा आणि खेळ सुरु झाले. आणि आमच्या मित्रांच्या गुणांना अगदी उधाण आलं. सगळ्या आवडीच्या गोष्टी. आम्ही मित्रांनी ‘गरवारे भजन-दिंडी’ स्पर्धेत भाग घेतला. बाहेरून कोणी तरी एक नवीन सर आम्हाला भजनं शिकवायला यायला लागले. दोन महिने तालमी चालल्या. एकनाथांची भजनं पाठ केली. आषाढी एकादशीच्या सुमारास मृदंग-पेटीच्या तालासुरात टाळ वाजवत टिळक रोडवर हिराबागेपासून अलका टॉकीजपर्यंत दिंडीत आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं. खूप मजा आली. बहुधा आमच्या शाळेला बक्षीसही मिळालं असावं. या सगळ्यात नितीन होताच.
त्यानंतर भाद्रपदात लगेच शाळेचा गणपती बसला. आमच्या मित्रांचा अर्थात त्यातही हिरीरीने सहभाग होताच. त्यावेळची एक आठवण चांगली लक्षात आहे. शाळेची जागा छोटी. पटांगणंही अगदी लहानसं. शाळेच्या एकमजली इमारतीवर दुसरा मजला नुकताच चढला होता. त्याच इमारतीच्या पार्किंग सदृश तळ मजल्यावर गणपती बसवायचा होता. स्थापनेच्या दिवशी सगळी मुलं शाळेच्या गल्लीत गणपतीबरोबर नाचत येत होती. नितीनसकट माझे सगळे मित्र नाचत आहेत, आणि मला मात्र शिक्षकांनी मखरासमोर अथर्वशीर्ष म्हणायला बसवून ठेवलं होतं. ते ही अथर्वशीर्षाची एकवीस पारायणं करायला! खरंतर मित्रांबरोबर बाहेर नाचायचं होतं, पण मला त्या पार्किंग मध्ये तास-दोन तास अगदी कोंडल्यासारखं झालं होतं.
त्याच सुमारास बहुतेक नितीनलाच दलाचा शोध लागला. पौड फाट्याजवळ सध्या अभिनव विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाची उंच शाळा उभी आहे. ती जागा म्हणजे तेव्हा एक रिकामं मैदान होतं. त्या जागेत ‘पं. दीनदयाळ उपाध्याय विद्यालय’ नावाची पुणे महानगरपालिकेची छोटीशी शाळा होती. पांढरे ऍसबेसटॉसचे पत्रे असलेले बैठी इमारत. अगदी तीन-चारच वर्ग असावेत. मागे छोटीशी शाळा आणि पुढे भलंमोठं पटांगण. बरंचसं ओबडधोबड. त्या पटांगणात पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनी शाळेनी ‘महर्षी कर्वे दल’ सुरु केलं होतं. रोज संध्याकाळी सहा ते साधारण अंधार पडेपर्यंत, म्हणजे साडेसात-आठपर्यंत, सहावी ते दहावीतली मुलं तिथे जमायची. तिथे आम्ही मुलं कवायती करायचो. कबड्डी, व्हॉलीबॉल, बेसबॉल असे खेळ खेळायचो. ज्ञान प्रबोधिनी शाळेत शिकलेले वयानी आमच्यापेक्षा मोठे असलेले विद्यार्थी मार्गदर्शक असायचे. कधी-कधी एकदा दादा आम्हाला काही ‘बौद्धिक’ सांगायचा. या दलात आम्ही जायला लागलो आणि तिथे नितीनच्या नवीन बाजू कळल्या.
आमच्या दलाची कामं नितीन करायचा. खेळाचं साहित्य कोठीमधून आणायचं आणि ठेवायचं काम त्याचं होतं. खेळून झाल्यावर सगळ्या मुलांना ‘सकस आहार’ म्हणून ओंजळभर भिजवलेले शेंगदाणे किंवा मटकी खायला मिळायची. दोन तास रगडून खेळल्यावर ती अगदी चवदार लागायची. आदल्या रात्री पाटीभर शेंगदाणे किंवा डाळी भिजण्याचं काम नितीननी केलेलं असायचं. शाळा, अभ्यास, खेळणं वगैरे सांभाळून हा सहावी-सातवीतला मुलगा बरीच कामं स्वतंत्रपणे करायचा.
दलाच्या मैदानापासून अगदी जवळ कॅनॉलच्या रस्त्याला लागून एका बैठ्या कौलारू चाळीत नितीन राहायचा. घरची परिस्थिती वगैरे अश्या गोष्टी तेव्हा कळतही नव्हत्या. घर लहान असावं त्यामुळे आत जायचा प्रश्नच नव्हता. कॅनॉलच्या रस्त्यावर सायकल लावून हाक मारायची आणि दाराच्या पडद्यामागून नितीन बाहेर यायचा. त्याचा मोठा भाऊ आणि धाकटी बहीण आमच्याच शाळेत होते, पण त्याच्याशी कधी बोलल्याचं आठवत नाही.
त्या काळात नितीनबरोबर आम्ही सर्वांनी बऱ्याच गोष्टी हौसेनी केल्या. टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या भल्यामोठ्या पटांगणावर पुण्यातल्या सगळ्या दलांबरोबर कवायती केल्या. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ज्ञान प्रबोधिनीच्या पथकात भाग घेतला. निधी उभारणीसाठी स्टॉल लावून राख्या विकल्या. अजून बरंच काही. दलात जाणं आमचं दहावीपर्यंत म्हणजे तीन-चार वर्षे चाललं.
दहावी-बारावीनंतर आमचे मार्ग वेगवेगळे झाले. काही मित्र सायन्सला गेले, तर काही कॉमर्सला. पण नितीनला तेव्हा सगळ्यात जास्त आत्मजागरूकता असावी. आपल्याला काय आवडतं आणि काय आवडतं नाही याची त्याला कल्पना होती. त्यामुळेच मित्र सायन्स-कॉमर्सला जात असताना वाहावत न जाता त्यांनी टेलरिंग कॉलेजला नाव घातलं आणि तो शिवणकाम शिकायला लागला. पूर्वी रोज व्हायच्या त्या भेटी हळूहळू कमी व्हायला लागल्या, पण प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकलेलं तो सांगायचा किंवा दाखवायचा. सुरुवातीला वर्तमानपत्राच्या कागदालाच कापड समजून त्याचं कटींग केलेलं दाखवायचा. कधी शर्टाचं कटिंग, तर कधी पँटचं कटिंग. दीड-दोन वर्षात त्याचं शिलाईचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी आम्ही मित्र कॉलेजात होतो.
शिलाईचं शिक्षण पूर्ण झाल्यावर नितीन उमेदवारी करायला लागला. डेक्कनला नटराज टॉकीजच्या मागे मुठा नदीवरुन जाणारा छोटा कॉजवे होता. आता तिथे काकासाहेब गाडगीळ अथवा 'झेड ब्रिज' आहे. त्या कॉजवे लगत कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या दाराजवळच्या एका छोट्या खोपटासारख्या दुकानात कपडे आल्टर करणे, रफ्फू करणे अशी कामं नितीन करायचा. बऱ्याच वेळा मी कॉलेजातून घरी येताना संध्याकाळी त्या खोपटासमोर सायकल लावून नितीनशी गप्पा मारून घरी यायचो. आम्ही मित्र शिकत असताना नितीन कमावता देखील झाला होता. आपला मित्र टेलर आहे, शर्ट-पँट शिवतो म्हणून त्याचं कौतुक वाटायचं.
दुसऱ्याच्या दुकानात उमेदवारी नोकरी करता करता नितीन आता आपली स्वतःची कामं घेऊ लागला होता. हळूहळू माझी आणि दादांची (माझ्या वडलांची) कपड्याची कामं आम्ही त्याला देऊ लागलो. आपली कामं खात्रीपूर्वक चांगली होतील आणि मित्राला मदत होईल असा दुहेरी हेतू त्यामागे असायचा. माप घ्यायला, कपडे द्यायला नितीन सायकलवर टांग मारून शनिवार-रविवारी घरी यायचा. त्यावेळची एक मजेदार आठवण. एकदा दादांचे पायजमे शिवायचे होते. नितीन टेपनी माप घेत होता. मापं लिहिता-लिहिता तो मिश्किल चेहरा करून हसत म्हणाला, “काका, तुमची कंबर आणि उंची दोन्हीचं माप सारखंच ४० इंच आहे”. नितीनसह आम्ही घरातले सगळे खळखळून हसलो होतो. त्यानंतर हे वाक्य म्हणजे आमच्या घरचा विनोदच झाला. नितीनचा विषय निघाला की दादा स्वतःच हा प्रसंग रंगवून सांगायचे.
१९९०-९१ च्या सुमारास नितीन स्थिरावला. अलका टॉकीज चौकात लक्ष्मी रोडच्या सुरुवातीला कुलकर्णी पेट्रोल पंप आहे. त्या पंपासमोर एक छोटा गाळा भाड्यानी घेऊन नितीननी ‘प्राईम मेन्स वेअर’ नावाचं स्वतःचं दुकान सुरु केलं. त्या उदघाटनाच्या सत्यनारायणाला अर्थात आम्हा मित्रांची उपस्थिती होती. खूप छान वाटलं. दुकानात एक-दोन मदतनीस कारागीर बरोबर घेतले होते. मदतनीस असले तरी गिऱ्हाइकाचे माप घेऊन कपड्याचे अचूक कटिंग करायचे हा नितीनचा हातखंडा आणि तो त्यानी शेवटपर्यंत सोडला नाही.
प्राईम मेन्स वेअर - पुणे, १९९२/९३ |
आम्हा मित्रांना गडकिल्ले भ्रमंतीची आवड होती. नाणेघाट, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा, वासोटा अशी भटकंती चालू असायची. सिंहगड तर दर रविवारी ठरलेला. नितीनवर मात्र आता दुकानाची आणि कामाची मोठी जबाबदारी होती, त्यामुळे तो आमच्या भ्रमंतीत आलेला आठवत नाही.
पुढे काही वर्षांनी माझ्या लग्नाचा उत्तम ‘थ्री पीस सूट’ नितीननीच शिवून दिला होता. अगदी त्यावेळच्या फॅशनला आणि माझ्या अंगाला सूट होईल असा. कोटाच्या आतल्या बाजूला ‘प्राईम मेन्स वेअर’चे रुबाबदार लेबल. त्यानंतर सूट घालायची फार वेळ आली नाही ही गोष्ट वेगळी. अजूनही तो सूट हँगरला टांगून माझ्या कपाटात आहे.
लवकरच नोकरीनिमित्त माझा भारत सुटला. मग भारतात आलं तरच मित्रांची भेट होऊ लागली. धावत्या भेटीत सगळ्यांना भेटणं जमेलच असं नाही. मित्रही नोकरी-धंद्यामुळे पांगले होते. पण नितीन मात्र लक्ष्मी रोडवरच्या त्याच्या दुकानात हमखास भेटायचा. त्याची नवीन प्रगती कळायची. काही वर्षांनी त्यानी दुकान पूर्ण रिनोव्हेट करून एकदम अद्यावत करून घेतलं. मोठे आरसे, भरपूर दिवे. प्राईम मेन्स वेअरचं रूपांतर एकदम चकाचक शोरूममध्ये झालं होतं. लोक रेडिमेड कपडे घालायला पसंती देत आहेत हे पाहून त्यानी स्वतःचा प्रायव्हेट ब्रँड तयार केला आणि रेडिमेड शर्ट करून विकायला सुरुवात केली. ते ही मी घेऊन वापरले.
एव्हाना नितीनचं कविताशी लग्न झालं होतं. दुकानातच नितीनला भेटणं सोयीचं असल्यामुळे कविताला भेटायचा योग कित्येक वर्ष आला नाही. पण प्रत्येक वेळी त्याच्याकडून कविताची तारीफ ऐकू यायची. गुजराथी घरातून आलेल्या कविताने नितीनच्या मूळच्या उत्तम व्यवसायाची अजून भक्कम घडी बसवली. नितीनला खऱ्या अर्थानी स्थैर्य आणि सौख्य मिळालं. मोठी गाडी घेतली. बाणेर रस्त्यावर मोक्याच्या जाग्यावर मोठा दुमजली बंगला बांधला. खालच्या मजल्यावर नवीन दुसरी शोरुमही सुरु केली. या जून महिन्यामध्ये त्यानी मला गाडीत बसवून नवीन घरी नेलं. घर दाखवलं. शोरूम दाखवली. नितीन आता किती कारागिरांच्या घरांचा अन्नदाता झाला होता कुणास ठाऊक. पूर्वीचा सडपातळ नितीन आता सुदृढ झाला होता. डोळ्यावर चष्मा आणि पांढरे केस डोकवायला लागले होते. थोडासा शेटजी दिसायला लागला होता. पण त्याचा स्वभाव मात्र अजिबात बदलला नव्हता. तसाच मितभाषी. यशाचा दर्प त्याला शिवला नव्हता. आपली भरभराट आई-वडिलांना पाहता आली याचं त्याला समाधान होतं.
प्राईम शोरूम - बाणेर, २०१८ |
सामान्य परिस्थितीतून येऊन केवळ स्वकष्टाच्या बळावर नितीननी स्वतःच्याच नाहीतर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करून ठेवली होती. जेमतेम पन्नास वर्षाचं आयुष्य त्याला मिळालं.
नितीनच्या जाण्यानी एक कष्टकरी आणि सच्चा मित्र गमावला असं दुःख वाटतं. बरेच प्रश्न पडायला लागतात. पण मग महाकवी गदिमांच्या ओळी आठवतात…
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माझ्या आणि मित्रांच्या आयुष्यात नितीन आला याबद्दल नियतीचे आभार मानण्याशिवाय आपण अजून करू तरी काय शकणार आहे?
(लेखन: मिलिंद कुलकर्णी - ३१ डिसेंबर २०१८)
Very true Nicely verbalised 👌
उत्तर द्याहटवाmiss you nitya