“जसराज काय गाणी बोलले?”
“जसराज काय गाणी बोलले?” लेखक: मिलिंद कुलकर्णी बदल हाच जगाचा नियम आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तर बदलाचा वेग अजूनच प्रचंड वाढतो आहे. हा बदल सतत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येतो आहे. उपयोगी आणि निरुपयोगी नवनवीन माहिती दर मिनिटाला WhatsApp किंवा फेसबुकमार्गे फोनवर दिसते आहे. फोनमधून डोकं वर काढावं तर चोवीस तास भडक बातम्या ओकणारी खाजगी टीव्ही चॅनेल्स आहेत. वृत्तपत्रांची पण तीच परिस्थिती. या मधली मराठी भाषा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर लक्षात येतं की गेल्या वीस वर्षात मराठी खूपच बदलली आहे. मराठी भाषेतल्या योग्य आणि चपखल शब्दांचा वापर कमी होताना दिसतो आहे. असं का होतंय ते कळत नाही. कदाचित सगळ्या लोकांना समजावं म्हणून भाषा बिघडवायची असं काही टीव्हीवाल्यांनी परस्पर ठरवलं असावं का? किंवा त्यांनाच अजून मराठी भाषेची ताकद समजलेली नाही? मराठीत अनेक शब्द असे आहेत की त्यांना सांस्कृतिक किंवा गर्भित अर्थ आहे. ‘नारळ’ आणि ‘श्रीफळ’ या शब्दांचा अर्थ जरी एकच असला तरी दोन्हीची छटा वेगळी आहे. ‘पाणी’ आणि ‘तीर्थ’. ‘तांदूळ’ आणि ‘अक्षता’. अजून कितीतरी उदाहरणं आहेत . शब्दाचे अर्थ एकच, पण भ